अकोला दि.11: जिल्ह्यातील बाळापूर व अकोला तालुक्यात गुरुवारी (दि.7) अतिवृष्टीमुळे 864 हेक्टर वरील पिकांचे तर 47 घरांचे अंशत: नुकसान झाले. त्यामध्ये प्रामुख्याने कापुस, सोयाबीन व तुर पिकाचा समावेश असून एका जनावराचा सुद्धा पावसामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (दि.8) सरासरी एकूण 19.5 एमएम पाऊसाची तर बाळापूर तालुक्यातील निंबा येथे 76 एमएम पावसाची नोंद झाली.
अकोला व बाळापूर तालुक्यात जोरदार पावसामुळे नदी व नाल्यांच्या काठी वस्ती असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे बाळापूर तालुक्यातील सात घरांचे तर अकोला तालुक्यातील 40 घरांचे नुकसान झाले. बाळापूर तालुक्यातील एका जनावरांचा मृत्यू झाला. तसेच पावसामुळे अकोला तालुक्यातील 814 व बाळापूर तालुक्यातील 50 हेक्टर असे एकूण 8 64 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर पिकांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनाव्दारे देण्यात आले.