अकोला दि.8: – दर वर्षी 6 जुलै हा दिवस जागतिक प्राणीजन्य रोग दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्त स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे पाळीव कुत्र्यांकरिता मोफत रेबिज रोग प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे पशुवैद्यक चिकित्सालय संकुल येथे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांचे हस्ते फीत कापून व श्वानाला रेबिज रोग प्रतिबंधक लस टोचून करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी रेबीज रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता आपल्या श्वानांना दरवर्षी रेबीज प्रतिबंधक लस न चुकता टोचावी असे आवाहन श्वानप्रेमींना केले.
सदर शिबिरात 100 श्वानांना आणि मांजरांना रेबिज रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले व लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. रेबिज रोग प्रतिबंधक लस मेसर्स इंडियन इमुनोलोजिकल्स हैदराबाद तर्फे पुरस्कृत करण्यात आली होती. यावेळी इंडियन इमुनोलोजिकल्सचे झोनल मॅनेजर अशोक लोंढे आणि निरंजन तसेच संस्थेचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ पावशे, डॉ थोरात, डॉ कुरळकर प्रामुख्याने उपस्थित होते. शिबीर यशस्वीरीत्या पार पडण्याकरिता शिबिराचे समन्वयक डॉ. सुनील वाघमारे, चिकित्सालय अधीक्षक यांनी अथक परिश्रम घेतले तर डॉ. रणजीत इंगोले, डॉ. रत्नाकर राऊळकर, डॉ. महेश इंगवले, डॉ श्याम देशमुख आणि डॉ. भुपेश कामडी यांनी सह-समन्वयक म्हणून काम केले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.