अकोला,दि.5: जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये मुस्लीम बांधवांचा ईद उल जुहा (बकरी ईद) उत्सव रविवार दि. 10 जुलै रोजी साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने बकरी ईदच्या दिवशी अवैध हत्या व वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपाययाजनाचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
आदेश याप्रमाणे :
१. कोणतीही व्यक्तीस जिल्ह्यातील रहदारीच्या, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याचे कडेला, उघडयावर जनावरांची कत्तल व मांस विक्री करण्यास प्रतिबंधीत राहिल.
२. महानगर पालिका अथवा नगर परिषद यांनी परवानगी दिलेल्या स्थळीच जनावरांची कत्तल व मांस विक्री करण्यास परवानगी राहील.
३. अवैध कत्तली संदर्भाने जनावरांची इतर ठिकाणाहून अकोला जिल्ह्यामध्ये वाहतूक करता येणार नाही.
४. नमूद केलेल्या बाबींचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती नियमानुसार कारवाईस पात्र राहील.
५. महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला व आयुक्त महानगर पालिका अकोला तसेच जिल्ह्यातील इतर शहरी भागामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद व स्थानिक पोलीस प्रशासन यांनी संयुक्त पथकाचे गठण करुन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व प्रतिष्ठाण याच्यांवर नियमानुसार कारवाई करावी.
६. ग्रामीण भागामध्ये जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी यांनी आदेशाचे पालन होण्याचे दृष्टीने आवश्यक ते नियोजन करुन उचित कार्यवाही करावी.
७. जिल्ह्यामध्ये अवैध जनावरांची वाहतूक रोखण्याचे दृष्टीने सर्वेक्षण व देखरेख करण्याकरिता 17 पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यान्वीत केलेल्या 27 चेक पोस्ट नाक्याचे संबंधाने दैनंदिन अहवाल व महानगर पालिका व शहरी भागामध्ये वरील आदेशानुसार स्थानिक बाजारपेठेमध्ये केलेल्या तपासणीचा अहवाल जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त यांनी जिल्हादंडाधिकारी यांना सादर करावा.
८. अवैधरित्या जनावरांची इतर ठिकाणाहून जिल्ह्यामध्ये वाहतूक होणार नाही या दृष्टीने पोलीस विभाग, स्थानिक प्राधिकरण, पशू संवंर्धन अधिकारी जिल्हा परिषद व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
९. आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संबंधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आपले स्तरावरुन योग्य ते नियोजन करावे.
१०. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून कोणताही अनूचित प्रकार घडू नये या दृष्टीने संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून संवेदनशिल ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा.