अकोला, दि.4 : वृक्ष लागवड व मनरेगा योजनेतून तीन वर्षांपर्यंत लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन या उपक्रमाअंतर्गत आजपासून जिल्ह्यात वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. बार्शी टाकळी तालुक्यातील महान, तिवसा व रेडवा या गावांमध्ये जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. गावांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ यांनीही या लागवड मोहिमेत सहभाग घेतला.
ग्रामपंचायतींमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत असून वृक्ष देखभालीसाठी तीन वर्षे पर्यंत मनरेगा योजनेतून मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे, तहसिलदार गजानन हमंद, गटविकास अधिकारी कालिदास तापी आदी उपस्थित होते. याच उपक्रमाअंतर्गत महान येथे धरणाजवळील टेकडी परिसरात 2600 रोपे लावण्याचे नियोजन आहे, तिवसा येथे स्मशानभुमीच्या परिसरात 200 तर रेडवा येथेही स्मशानभुमीच्या परिसरात 200 रोपे लावण्याचे नियोजन आहे. या उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी रोपांची लागवड करुन प्रारंभ केला. या कार्यक्रमास स्थानिक सरपंच, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य. शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.