सखी म्हणजे आपली मैत्रिण, जिला आपण आपल्या सर्व समस्या, भावना, आपले मनात असणारे प्रश्र सांगतो. त्यावर उपाय विचारतो, त्याच प्रकारे आपले हे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ आहे. कौटुंबिक वा अन्य हिंसाचाराने पिडित महिला, संकटग्रस्त महिलांना या योजनेव्दारे सखीप्रमाणे सर्व प्रकारची मदत या केंद्रात केली जाते. ‘सखी’ ही योजना केंद्र पुरस्कृत असुन जिल्हा महिला व बाल विकास अंतर्गत राबविण्यात येते. जिल्हा स्त्री रूग्णलय अकोला वार्ड क्र. 7 मध्ये दि.10 फेब्रुवारी 2017 पासुन हिंसाचाराने पिडीत महिलांना वैद्यकीय मदत, पोलीस साहाय्य, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, निवारा अशी पाच प्रकारची मदत करते.
‘सखी’ योजनेचा मुख्य उद्वेश
संकटात सापडलेल्या महिलांना काळजी व संरक्षणाची गरज आहे. हुंडाबळी, ऑनर किलिंग, ॲसिड हल्ला, लैंगिक छळ, बाल लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार, बाल विवाह, भ्रुणहत्या, सती प्रथा इ. संकटात सापडलेल्या महिलांना वन स्टॉप सेंटर एकाच छताखाली वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, निवारा इ. तातडीने व निःशुल्क पुरविण्यात येतात. जिल्हा स्त्री रुग्णालयात सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत असुन या योजने अंतर्गत घरगुती, घरच्या बाहेर, कामाच्या जागेवर इतर कोणत्याही ठिकाणी हिंसाचार होत असेल अशा पिडीत महिलांना सर्व सोयी-सुविधा एका छताखाली मोफत 24 तास पुरविल्या जातात.
‘सखी’केंद्रात प्रवेश कसा मिळतो?
हिंसाचाराने पिडित महिला स्वतःप्रवेश घेऊ शकते किंवा हेल्पलाईन नंबरव्दारे, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, नातेवाईक, मित्र/ मैत्रीणी, स्वयंसेवक मार्फत, दवाखान्यामार्फत आपला प्रवेश घेवू शकते. शारिरीक, लैंगिक, आर्थिक, शाब्दिक, किंवा भावनीक छळ हा हिंसाचार मानला जातो. महिला व मुलांमधील शारिरीक व मानसिक व्याधीचे अनेकदा लक्षणीय कारण लैंगिक हिंसा हे असते. लैंगिक हिंसा निरनिराळ्या स्वरूपात केली जाते. तसेच ती कोणाकडुनही केली जावू शकते. बहुतेक वेळा हिंसा करणारी व्यक्ती ही हिंसाग्रस्त व्यक्तीच्या ओळखीतलीच असते असेही दिसुन येते.
भारतात बालकांवर होणाऱ्या लैंगिक हिंसेचे प्रमाण मोठे आहे. महिला व बाल कल्याण विभागातर्फे केल्या गेलेल्या राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासामध्ये असे आढळले की, 13 राज्यांमधुन 53% बालकांनी कोणत्या न कोणत्या प्रकारची लैंगिक हिंसा नोंदविलेली आहे. बहुतेक प्रसंगात हिंसा करणारी व्यक्ती ही बालकाच्या ओळखीतील असते व काही वेळा तर त्याच घरात राहणारी असते. अनेकदा आपल्यावर हिंसा होत असल्याचे बालकांना समजत नसते.हिंसा करणाऱ्या व्यक्ती अनेकदा चॉकलेट किंवा खेळण्याची आमिषे दाखवुन लहान मुलांना आकर्षित करतात असे आढळुन येते. शिवाय, लहान मुले धमकी दिल्यास लगेच घाबरतात व त्यामुळे असे कृत्य गुप्त राहण्याची शक्यता अधिक असते.
स्त्री असणे ह्या एकमेव कारणामुळे वाट्याला येणारे किंवा विपरीत परिणाम करणारे विविध प्रकारचे हिंसक वर्तन स्त्री विरोधी हिंसा या संज्ञेत समाविष्ट केले गेले आहे. वैयक्तिक किंवा सार्वजनिक आयुष्यातील लिंगभेदावर आधारीत अशी कोणतीही हिंसा ज्यामुळे स्त्रिला शारिरीक, लैंगिक किंवा मानसिक इजा पोहचणे अर्थात स्वरूप किंवा ठिकाण कोणतेही असेल तरी हिंसेमुळे स्त्रियांचा विकास खुटतो व त्यांना स्वतःच्या ठायी असलेल्या वैयक्तिक मतांना पुर्णपणे वाव देणे शक्य होत नाही.
आपल्या समाजामध्ये अनेकदा स्त्रियांवरील हिंसेला सार्वजनिक मान्यता मिळालेली आढळते. यांचे मुख्य कारण कौटुंबिक मामला मानला जातो. जोपर्यंत पिडीत स्त्री कुटुंबातील अत्याचार करणाऱ्याविरूद्ध तक्रार करत नाही, तोपर्यंत इतरांनाही त्यात लक्ष घालणे कौटुंबिक स्वायत्तेचा संकोच करणारे ठरते. दुसरे कारण लहान मुलांना रागावणे, प्रसंगी मारणे, जे काही जणांना योग्य वाटते. उदा. माहेरी असो सासरी, कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रिवर जर तिचा नवरा, बाप, भाऊ, मुलगा किंवा अगदी त्या कुटुंबातील इतर स्त्रियाही अत्याचार करीत असतील तरी त्यात कोणालाच काही वावगे वाटत नाही. उलट अत्याचार करणाऱ्याचा तो अधिकारच मानला जातो व पिडीत स्त्रिला मात्र मुकाट्याने अत्याचार सहन करणे किंवा त्याला विरोध केल्यास त्यासोबत येणारा सामाजीक धिक्कार व लाज याला तोंड देणे एवढेच पर्याय उरतात.
अन्याय सहन करू नका, कायद्याची मदत घ्या,
सखी वन स्टॉप सेंटर सदैव आपल्या पाठीशी आहे
कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलेचे संरक्षण कायदा 2005 हिंसाचारापासुन महिलेचे संरक्षण करतो. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा पुरूषांच्या विरोधात नसुन मानवतावाद, कायदा, नैतिकता आणि न्याय यांच्याशी विसंगत वर्तन करणाऱ्या व्यक्ती विरोधात आहे. या कायद्याचे स्वरूप धर्मनिरपेक्ष आहे. सखी वन स्टॉप सेंटरमध्ये संकटग्रस्त महिलेला, अत्याचारित, पिडित, समस्याग्रस्त,फसवणुक झालेल्या, बालविवाह अशा अनेक समस्यांना बळी पडलेल्या महिलेला पोलीस मदत, आरोग्य मदत, कायदेशीर सल्ला व समुपदेशन हे एकाच छताखाली 24 तास सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
जीवन हे जगण्यासाठी आहे…मिळुन हा विश्वास निर्माण करू या!
आयुष्यात कधी-कधी असे क्षण येते असतील कि त्यावेळी आपण सगळ्यांना नकोशा झालो आहेत. आपल्यावर कोणीसुद्धा प्रेम करत नाही,असं तुम्हाला वाटत असेल, तर आता मात्र आपल्या दुःखाला वाट मोकळी करून देण्यासाठी सखी विभागाच्या रूपात ह्या हॉस्पिटलमध्ये एक जागा साकारली आहे. सखी ही या हॉस्पिटल मधील एक ओपिडी आहे.
सखी म्हणजे आधार! येथे येवून तुम्ही आपली समस्या मांडु शकता, तुमच्याशी बोलायला, कठीण परिस्थितीत वाट काढायला संवेदनशील तसेच अनुभवी जाणकार असतील. तुम्हाला त्याच्या सल्ला मिळेल. याशिवाय, वकिल सल्ला, पोलिसांची मदत व प्रसंगी पाच तात्पुरता निवारा यासाठीही सखी मदत करेल. याच्या जोडीला सरकारने नव्याने केलेल्या कायद्याची माहिती आपल्याला सखी मध्ये मिळु शकेल. तुम्ही कोणत्याही जाती- धर्माच्या असलात तरी तुम्हाला या कायद्याअंतर्गत मदत मिळु शकते. तुमच्यावर सासर माहेर किंवा इतर जवळचे नातेसबंध असणाऱ्यांकडुन जर हिंसा होत असेल तर तुम्ही या कायद्याची मदत घेवु शकता. कधी कधी परिस्थिती इतकी बिकट असते की तुम्ही स्वतः दाद मागु शकत नाही तेव्हा इतर कोणीही तुमच्या बाजुने ह्या कायद्याव्दारे दाद मागु शकतात. बऱ्याचदा स्त्रियांना मुख्य भीती असते की, आपल्यावर होणाऱ्या हिंसेविरूद्व बोलल्यास आपल्या डोक्यावरचे छप्पर जाईल. परंतु या कायद्याची मदत घेवुन तुम्ही त्याच घरात राहुन तुमच्यावर होणाऱ्या हिंसेला प्रतिबंध करू शकता. आता आपले हात बळकट झले आहेत. कारण या कायद्याचे पाठबळ आपल्याला मिळले आहे. प्रत्येकीला हिंसेपासुन, मारझोडीपासुन, त्रासापासुन मुक्त कुटुंब हवे आहे. त्यासाठी सखी प्रयत्न करत आहे. कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर हिंसा करण्याचा अधिकार नाही हेच सखीचे ब्रीद आहे. सखी मध्ये आल्याने एकटेपणा कमी होवून तुमचा जगण्याचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी हा विभाग तत्पर आहे.
तुम्ही बदल घडवू शकता
तिच्या अनुभवाला महत्व द्या
तिच्या निर्णयाचा आदर करा
तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवा
हिंसा हा तिचा अपराक्ष नव्हे”
“सखी” तुमच्या करीता सुरक्षित जागा आहे
“सखी” कडे या आणि बोलक्या व्हा !
त्याकरीता कार्यालयाला संपर्क साधणे करीता खालील भ्रमणध्वनी 24 तास उपलब्ध आहे.
केंद्र प्रशासक – एम. डी. भोरे -9028161369
आय. टी. वर्कर. –ए. आर. चतरकर – 8623096286
लेखनः-श्रीमती ए.आर. चतरकर
सखी वन स्टॉप सेंटर, वार्ड क्र. 7, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला