हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही आणि शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ठरल्याप्रमाणे झालं असतं, तर मला मुख्यमंत्री व्हावे लागले नसते, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पहिल्यांदाच मी फेस टू फेस आलो असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
ठाकरे म्हणाले की, अडीच वर्षापूर्वी माझे आणि अमित शहा यांच्यामध्ये अडीचअडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरले होते. त्यानंतर शहा यांनी त्यास नकार दिला. परंतु जे काही आज केलं, ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही. त्यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिले असते. तर मला मुख्यमंत्री व्हावे लागले नसते. मला राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाण्याची गरज पडली नसती. मला खरंच दु:ख झाले आहे. माझ्या पाठीत सुरा खुपसला. पण मुंबईच्या काळजात खुपसू नका. माझा राग मुंबईवर काढू नका, असे आवाहन करत उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाले.
माझं आणि अमित शहाचं ठरलं होतं, त्याप्रमाणे अडीच अडीच वर्षे भाजप आणि अडीच वर्षे शिवसेनेने कार्यभार सांभाळला असता. अमित शहांनी शब्द पाळला असता, तर 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. काय झालं असतं ते गोडी गुलाबीने झालं असते. आज एक शानदार मुख्यमंत्री झाला असता, असेही ते म्हणाले.
मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईसाठी मी हात जोडून विनंती करतो की, मेट्रो कारसाठी आरेचा आग्रह करू नका. आरेमध्ये काही प्रमाणात वृक्ष तोडून देखील आज येथे वन्यजीव अस्तित्व आहे. आरेचा निर्णय बदलल्याने मला दु;ख होत आहे. आता वरखाली तुमचंच सरकार आहे. त्यामुळे आरेमध्ये कारशेडचा प्रयोग करू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.