अकोला, दि.1:- शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी गट क व गट ड मधील सामाईक प्रतिक्षासुचीची प्रारुप प्रतिक्षा यादी जिल्ह्याच्या www.akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे, त्यात दुरुस्ती असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना विभागात संपर्क साधावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटल्यानुसार, शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यु झालेल्या कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी यादी ठेवण्याची तरतुद आहे. दि. 21 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णय मधील तरतुदीनुसार अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गट- क व गट-ड सामाईक प्रतिक्षासूची ठेवण्याची कार्यपद्धती आहे.
अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांकडून प्राप्त अनुकंपातत्वावरील यादीनुसार सामाईक यादी ठेवण्यात आली आहे. तसेच ज्या उमेदवारांना यापूर्वी शासकीय नोकरी नियुक्ती देण्यात आलेली आहे व ज्यांना वयाची 45 वर्ष पूर्ण केली आहे अशा उमेदवारांची नावे यादीतून कमी करून प्रारुप यादी प्रसिद्ध झालीआहे. त्या यादीनुसार गट -क यादीमध्ये 89 व गट – ड मध्ये 68 उमेदवारांचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध कार्यालयाकडून आलेली नावे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील गट -क व गट – ड सामाईक प्रतीक्षासूचीत समाविष्ट करण्यात आली असून त्याबाबतची प्रारूप प्रतीक्षायादी www.akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामाईक प्रतिक्षा यादीमध्ये अनुकंपा उमेदवारांनी नावातील दुरुस्ती, पत्ता, शैक्षणिक अर्हता, जन्म दिनांक यामध्ये काही त्रुटी असल्यास कागदपत्रांसह आस्थापना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि.10 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.