शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हाेतील, अशी घाेषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मी या सरकारच्या बाहेर राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजप शिवसेना युतीचे सरकार बनेल, अशी घाेषणा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान माेदींनी केली होती. मात्र हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली आणि भाजपला बाहेर ठेवले. त्यावेळी जनमताचा अवमान केला.
महाविकास आघाडी सरकारने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना विरोध केला. त्यातच प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. यासरकारमधील दोन मंत्री मनी लॉड्रींग प्रकरणात जेल मध्ये गेले. दाऊदची संबंधित मालमत्ता खरेदी केली त्या मंत्र्याला अटक व्हावी लागली. ज्यांच्याशी लढलो त्यांच्याशी कसे बसयाचे, कशी कुचंबणा शिवसेना आमदारांची झाली होती. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कॅबिनेट घेता येत नाही. काल घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज रात्री साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी हाेईल. यानंतर चर्चा करुन मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार : एकनाथ शिंदे
भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने ते मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवले असते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद देण्याचा त्यांनी मनाचा माेठेपणा देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. भाजपने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानताे. शिवसेना आणि भाजपचे सरकार हिंदुत्वाचा विचार पुढे नेईल, असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अडीच वर्षांपूर्वी काय घडलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ती एक वैचारिक तडजाेड हाेती. आमची भाजपबराेबर नैसर्गिक युती हाेती. त्यामुळे आम्ही पुन्हा भाजपबराेबर युती करण्याचा निर्णय घेतला. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये काेणतीही काम करता येत नव्हते, असेही शिंदे म्हणाले.