शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अन्य आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. महाराष्ट्रातील राजकारणात होत असलेली सत्तापालट अनेकांसाठी धक्कादायक आहे. यातच आता राज्यातील मंत्रीमंडळदेखील बरखास्त झालं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या आदल्याच दिवशी संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त झाले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत जे काम केलं आहे, त्याचं कौतूक राज्यभरातून होत आहे. इतकचं नाही तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी देखील उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं आहे.
काय आहे प्रकाश राज यांची पोस्ट?
‘उद्धव ठाकरे, तुम्ही खूप छान काम केलेत सर! मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळलं, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील..चाणक्य आज लाडू खात असले तरी तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो,’ असं प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे…
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल रात्री 9.30 च्या सुमारास फेसबुक लाईव्हवर येत जनतेला संबोधित केलं. ‘शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे. मला पदाचा लोभ नाही. मला खेळ खेळायचाच नाही, असं म्हणत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. उद्यापासून मी पुन्हा शिवसेनेच्या भवनात बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार, असं म्हणत त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.