अकोला,दि.28: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारे चित्रप्रदर्शन हा उत्कृष्ट उपक्रम असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय त्यातून होईल, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी आज केले.
चाचोंडी येथील डवले महाविद्यालयात आज या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. मिटकरी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,प्राचार्य प्रकाश डवले, विशालराजे बोरे, बार्टीच्या ॲड. वैशाली गवई, अनिल चोतमल आदी मान्यवर उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये व जिल्हा परिषद शाळांमधून हे प्रदर्शन दाखविले जाणार आहे. येता महिनाभर हा उपक्रम सुरु राहणार आहे. या छायाचित्रांमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जिवनातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे आदेश, दुर्मिळ कागदपत्रे, वास्तू, चित्रे इ. सादर करण्यात आले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संकलनातून या प्रदर्शनातील छायाचित्रे सादर करण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांचे सहकार्य लाभले आहे.
या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचे जीवनकार्य अभ्यासावे व त्यावर निबंध लिहून सादर करावे. निबंध स्पर्धेतील विजेत्यांना कोल्हापूर सहल घडवून शाहू महाराजांच्या जीवनकाळाशी निगडीत घटनास्थळे, त्यांचे सामाजिक कार्य इ. स्थळांची प्रत्यक्ष भेट घडविण्यात येईल,असे आश्वासनही आ. मिटकरी यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमापूजनाने झाली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व आ. मिटकरी यांनी यावेळी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रास्ताविक ॲड. वैशाली गवई यांनी तर आभार प्राचार्य डवले यांनी मानले.