सध्या देशात अग्निपथ योजनेवरून गदारोळ पसरला आहे. या योजनेच्या मुद्यावर युवकांकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणाी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या मुद्द्यावरुन केंद्रतील सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, आता यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे.
दिल्ली-एनसीआरमधील केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या विकास कामाच्या अनुषंगाने त्यांनी भाषण केले आहे. प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉरच्या मुख्य बोगद्याचे आणि पाच अंडरपासचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, चांगल्या हेतूने राबवण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी ह्या राजकारणात अडकल्या जात आहेत. प्रसार माध्यमेदेखील टीआरपीसाठी या गोष्टींत अडकत आहेत.
पुढे ते म्हणाले की, चांगल्या हेतूने राबवण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी ह्या राजकारणात अडकल्या जात आहेत. सेंट्रल विस्टा आणि संसदेच्या नव्या इमारतीचे काम प्रगतीपथावर असून देशाच्या राजधानीबाबत येत्या काही काळात चांगली चर्चा होणार असून प्रत्येक नागरिकाला याचा अभिमान वाटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, केंद्र सरकारने मंगळवारी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार, 17 ते 21 वर्ष या वयोगटातील तरुणांना सैन्यात दाखल करुन घेतले जाणार आहे. मात्र, ही नियुक्ती फक्त चार वर्षांसाठी असणार आहे. चार वर्षानंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना एकत्रितपणे जवळपास 12 लाखांचा निधी दिला जाणार आहे. त्याव्यक्तिरिक्त पेन्शन अथवा इतर लाभ दिले जाणार नाहीत. अग्निपथ योजनेवर टीका करण्यात येत असून काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शवला आहे.