पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आणि उद्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त खास घरी जाऊन भेट घेतली. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याची (Modi in Gujarat) सुरुवात करताना मोदींनी आपली आई हिराबेन यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत वेळ घालवला. आईसोबतच देवाची पूजाही केली. आईचे चरणही धुतले. आशीर्वाद घेतला. आईला खास शाल देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. यानंतर मायलेकांनी एकमेकांना मिठाई भरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी ( Heeraben Modi ) यांनी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यानिमित्त खास नरेंद्र मोदी यांनी राहत्या घरी भेट घेत आईसोबत वेळ घालवला.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींनी त्यांच्या मातोश्रींच्या निरोगी आयुष्यासाठी वडनगर येथे काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. दुसरीकडे गांधीनगर येथे एका नव्या रस्त्याला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं नाव दिलं जाणार आहे. हिराबेन मोदी सध्या नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे राहतात. मोदींचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ साली झाला होता. यंदा १८ जून २०२२ मध्ये त्या आपल्या १०० व्या वर्षात पाऊल टाकत आहेत. पंतप्रधान देखील आज गुजरातमध्ये आहेत आणि ते मातोश्रींच्या वाढदिवशी पावागढ मंदिराला भेट देतील. त्यानंतर वडोदरा येथील एका रॅलीला संबोधित करतील.