देशात इंधनाचे दर स्थिर असताना पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या काळात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. आता घरगुती एलपीजी सिलिंडर जोडणी घेणे उद्या, गुरूवारपासून महागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅसच्या नवीन जोडणीच्या किंमतीत वाढ केली असून आता १४.२ किलो वजनी एलपीजी गॅस सिलिंडरची नवीन जोडणीसाठी ग्राहकांना २ हजार २०० रुपयो मोजावे लागतील. सध्या नवीन जोडणीसाठी १ हजार ४५० रुपये आकारले जात आहेत. जोडणी शुल्कात ७७० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तर, दोन सिलिंडरची जोडणी घेणाऱ्यांना ४ हजार ४०० रुपयांची सुरक्षा ठेवी आता जमा करावी लागेल. शिवाय नवीन जोडणी घेणाऱ्या ग्राहकांना १५० रुपयांऐवजी २५० रुपये देवून नवीन रेग्युलेटर घ्यावे लागेल. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम तसेच हिंदुस्तान पेट्रोलियमन ने पाच किलो वजनी सिलिंडरसाठी सुरक्षा ठेव ८०० रुपयांनी वाढवून १ हजार १५० रुपये केली आहे.
सध्या पेट्रोलियम कंपन्या १४.२ किलो वजनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी १ हजार ६५ रुपये आकारत आहे. सुरक्षा ठेव २ हजार २०० रुपये असेल. यासह रेग्युलेटर करीता २६० रुपये, पासबुक करीता २५ रुपये आणि पाईप साठी १५० रुपये द्यावे लागतील. या हिशोबाने सिलेंडर कनेक्शन तसेच पहिला सिलेंडर ग्राहकांना ३ हजार ६९० रुपयांचा पडेल.