अकोला दि.3: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या, तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीत झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम याप्रमाणे :
1. शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे.
2. सोमवार दि. 6 ते 7 जूनपर्यंत विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत काढणे.
3. गुरुवार दि. 9 जून रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे.
4. गुरुवार दि. 9 ते 13 जून 2022 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे.
5. गुरुवार दि. 16 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अभिप्राय देणे.
6. सोमवार दि. 20 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस(नमुना अ) जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे.
7. मंगळवार दि. 21 जून रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला(नमुना अ) व्यापक प्रसिद्धी देणे.