साकीनाका Sakinaka Rape Case बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहान याला दोषी ठरवत दिंडोशी सत्र न्यायालयाने आज ( दि. २) फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई येथील साकीनाका परिसरात गेल्या वर्षी 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान पीडीत महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
या प्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा अवघ्या १८ दिवसांत तपास पूर्ण केला होता. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. दिंडोशी न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
साकीनाका (Sakinaka Rape Case) येथील खैरानी रोड परिसरात एक ३० वर्षीय महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अशी माहिती पोलिस कंट्रोल रुमला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी महिलेची स्थिती गंभीर होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती. पण पीडित महिलेचा (Mumbai Rape case) उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवण्यात आला होता. साकीनाका येथे १० सप्टेंबर २०२१ रोजी घडलेल्या संतापजनक घटनेनंतर मुंबई हादरली होती.
बलात्काराच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेतील पीडितेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. बलात्कार आणि खून असे आणि इतर गुन्हे आरोपी मोहन चौहान याच्यावर नोंदवण्यात आले होते. मानवतेला काळिमा फासणारी अशी घटना साकीनाका येथील खैराने येथील एसजे फिल्म स्टुडिओ परिसरात घडली होती. रात्री उशिरा ३ च्या सुमारास या महिलेची चौहान याच्यासोबत भेट झाली. या दोघांत काही कारणांमुळे भांडण झाले. त्यातून आरोपीने या महिलेला मारहाण केली. यात ही महिला फुटपाथवरच बेशुद्ध पडली.
चौहान याने या महिलेला बाजूला उभ्या असलेल्या टेंपोत नेले आणि तेथे लैगिंक अत्याचार केले. त्यानंतर चौहान याने या महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवला. चौहान याने या प्रकारानंतर तेथून पळ काढला. पण घडलेला संपूर्ण प्रकार एक सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि तेथे उभ्या असलेल्या टेपोंतूनच या महिलेला हॉस्पिटलला हलवले. राजावाडी या हॉस्पिटलमध्ये या महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. पण गंभीर जखमी झालेली ही महिलेचा ११ सप्टेंबरला मृत्यू झाला.
या प्रकरणातील पीडित महिला ३२ वर्षांची होती. आणि तिची चौहानसोबत ओळख होती. दोघांत पैशाच्या वादातून भांडण झाल्याची माहिती, तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या दोघांची पूर्वीही काही वेळा भेट झाली होती. घटना घडल्याच्या दिवशी दोघांत भांडण झाले. आणि त्यातूनच चौहान याने या महिलेवर हल्ला करून नंतर बलात्कार केला. चौहान या मुळचा उत्तर प्रदेश येथील जौनपूर येथील रहिवाशी असून तो टेंपो चालक आहे. तर ही महिला रस्त्यावरच राहात होती. गुन्हा घडल्यानंतर चौहान संघर्ष नगर येथील तिच्या बहिणीच्या घरी गेला आणि तेथे आंघोळ करून गावी जात आहे, असे सांगून बाहेर पडत होता. पण पोलिसांनी सीसीटीव्हीवरून आरोपीला ओळखले होते, आणि तो पळून जाण्यापूर्वी त्याला बहिणीच्या घरातून अटक केली.
चौहान याने या महिलेच्या गुप्तांगात जे शस्त्र घुसवले होते. ते पोलिसांनी जप्त केले होते. तसेच एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारची साक्षही महत्त्वाची ठरली.