पुणे: देशात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के म्हणजेच सर्वसामान्य पाऊस पडणार आहे; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच 103 टक्के पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (दि. 31) जाहीर केला. हवामान खात्याचा हा दुसरा अंदाज आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसाचे म्हणजे मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा दुसरा अंदाज जाहीर केला. पावसाचा हा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिल्लीत झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केला.
हवामानशास्त्र विभागाने याआधी 14 एप्रिलला पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढविण्यात आला असून, तो 103 टक्के करण्यात आला आहे.