पुणे : जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार पुणे शहर व परिसरातील हवेची गुणवत्ता 10.1 पटीने खराब असल्याची नोंद रविवारी सायंकाळी झाली. शहरातील लोहगाव विमानतळ, येरवडा, निगडी हे परिसर अतिप्रदूषित, तर शिवाजीनगर कर्वे रोड, कात्रज रोड, पाषाण भागातील हवा अनारोग्यकारक असल्याचा अहवाल हाती आला आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सफार (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अॅन्ड वेदर फोरकास्टिंग अॅन्ड रिसर्च) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मोजली जाते.
देशात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद नंतर पुणे शहराची हवा दिवसेंदिवस खराब होत आहे. वाहनांची वाढणारी प्रचंड वर्दळ अणि इंधन ज्वलनातून निघणारे सूक्ष्म धूलिकण याचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार प्रमाणाबाहेर जात आहे. तसेच शहरात बांधकामे, राडारोडा यासह औद्योगिक प्रदूषण हे घटक देखील हवेची गुणवत्ता खराब करण्यात मोठा वाटा उचलत आहेत.