पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची संधी सोमवारपासून (दि.30) मिळणार आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना याद्वारे अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन, मात्र विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरता येणार आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. उर्वरित राज्यात प्रवेश प्रचलित पद्धतीने प्रवेश होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव व्हावा, यासाठी 23 ते 27 मे दरम्यान ‘मॉक डेमो रजिस्ट्रेशन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवेश अर्ज कसा भरावा, अर्ज भरताना काय माहिती आवश्यक आहे, याची कल्पना विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या सरावामुळे आली.