अकोला : शहरातील दोन उड्डाणपुलाचे लोकार्पण शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची सभा होणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जेलचौक ते अग्रसेन चौक आणि दक्षता नगर ते एनसीसी ऑफीसपर्यंतच्या दोन्ही उड्डाणपुलांची घोषणा नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानुसार या उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही उड्डाणपुलांचे लोकार्पण शनिवारी गडकरी करणार आहेत. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या अमृत सरोवर या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तर्फे जलसंधारण मोठे तलाव बांधकामाची कामे झाली आहेत. या कामांमुळे शेतीसाठी सिंचन क्षमता वाढली आहे. केंद्र शासनाच्या नीती आयोगानेही ती स्वीकारली आहे. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व बोरगाव मंजू येथे राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परीषदेला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीष पिंपळे, भाजपाचे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, नगरसेवक गिरीश जोशी उपस्थित होते.