मुंबई, 25 मे : एखादा व्यक्ती अस्वच्छ कपडे घालून फिरत असेल तर बऱ्याच जणांना तो भिकारी आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीनं खायला-प्यायला काही मागितलं किंवा पैसे मागितले, तर लोक देतात. भीक मागून आयुष्य काढणाऱ्या या व्यक्तींची देखील चांगली संपत्ती असल्याचे प्रकार यापूर्वी देखील उघड आलंय. असाच एक अस्वच्छ आणि घाण कपड्यांमध्ये फिरणारा स्वच्छता कर्मचारी (Sweeper) करोडपती असल्याचं समोर आलंय. मुख्य म्हणजे त्याच्याकडे एवढा पैसा आहे, असं त्याच्यासोबत काम करणाऱ्या कोणालाच माहीत नव्हतं.
काय आहे प्रकार?
उत्तर प्रदेशातील प्रयारगाजमधील (UP News) हा सर्व प्रकार असून धीरज असं या व्यक्तीचं नाव आहे. तो प्रयागराज (Prayagraj) येथील सीएमओ कार्यालयाच्या कुष्ठरोग विभागात एक स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतो.
प्रयागराज येथील सीएमओ कार्यालयाच्या कुष्ठरोग विभागात काम करणाऱ्या धीरजच्या खात्यात 70 लाख रुपये असून त्याच्याकडे जमीन आणि घरही आहे. विशेष म्हणजे त्याने गेल्या 10 वर्षांपासून बँकेतून त्याचा पगारही काढलेला नाही. आता बँक त्याला त्याचा पगार (Salary) काढण्याची विनंती करत आहे. मात्र सफाई कामगार धीरज लोकांकडे पैसे उसने मागून दैनंदिन खर्च भागवतो.
धीरजचे घाणेरडे कपडे पाहून लोक त्याला भिकारी समजतात. लोकांच्या पायाला हात लावून पैसे मागून तो आपला खर्च भागवतो. लोक भिकारी समजून त्याला पैसेही देतात. पण वास्तविक मात्र या धीरजच्या बँक खात्यात तब्बल 70 लाख रुपये आहेत. ‘आज तक’नं या संदर्भातील वृत्त दिलंय.
कसं उघडकीस आलं प्रकरण?
घाणेरडे कपडे घालून भीक मागत फिरणारा धीरज श्रीमंत असल्याची कोणालाच माहिती नव्हती. एकेदिवशी त्याचा शोध घेत बँकेचे कर्मचारी कुष्ठरोग कार्यालयात पोहोचले तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर धीरजचं खरं रूप कर्मचाऱ्यांना कळालं. त्यानं 10 वर्षांपासून पगार काढला नसून, त्याच्या नावावर घर (Home) आणि जमीन आहे, अशीही माहिती कर्मचाऱ्यांना मिळाली.
धीरजचे वडील याच विभागात स्वच्छता कामगार म्हणून काम करत होते आणि नोकरी सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या जागी धीरजला 2012 मध्ये नोकरी मिळाली. परंतु, नोकरीला लागल्यापासून आजपर्यंत धीरजने बँकेतून कधीही पगार काढला नाही. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे पैसे मागून तो आपला खर्च भागवतो. याशिवाय त्याच्या आईला पेन्शन मिळते, यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. विशेष म्हणजे, धीरजने पगारातला एक रुपयाही काढला नसला तरी इन्कम टॅक्स (Income Tax) न चुकता आठवणीने भरतो.
धीरज त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहतो. त्याचं अजून लग्न झालेलं नाही आणि त्याला लग्नही करायचं नाही. आपले पैसे (Money) कोणीतरी घेईल अशी भीती वाटत असल्याने त्याला लग्नच करायचं नाही. तर काही कर्मचाऱ्यांचा मते धीरजचं मानसिक संतुलन ठीक नाही. पण, तो त्याचं काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.