मुंबई : गतवेळच्या सरकारने राज्यातील पहिले व देशातील तिसरे क्लस्टर विद्यापीठ म्हणून होमी भाभा क्लस्टर विद्यापीठाची स्थापना केली. मात्र, याकडे सध्याच्या सरकारने दुर्लक्ष केले आहे. हे विद्यापीठ स्थापन होऊन तीन वर्षे होत आले तरी या विद्यापीठाला अद्याप कुलगुरू मिळालेले नाहीत, इतकेच नव्हे तर या विद्यापीठाअंतर्गत येणार्या चारही कॉलेजांमधील रिक्तपदांच्या भरतीबाबतही कोणत्याही हालचाली नाहीत.
डॉ. होमी भाभा विद्यापीठामध्ये शासकीय विज्ञान संस्था, मुंबई (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) हे मुख्य कॉलेज व सिडनहॅम कॉलेज, एलफिस्टन कॉलेज व शासकीय अध्यापक कॉलेज या चार कॉलेजांचा समावेश करत डॉ. होमी भाभा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चॉईस बेस्ट क्रेडिट सिस्टीमनुसार आंतरज्ञानशाखीय पद्धतीने आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्याची मुभा देण्यात आली होती. हे विद्यापीठ स्थापन होऊन तीन वर्षे होत आले तरी या विद्यापीठाला अद्याप कुलगुरू मिळालेले नाहीत.
रुसाच्या पहिल्या टप्प्यात या विद्यापीठाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 55 कोटी रुपये रुसाने मंजूर केले होते, मात्र हा सर्व निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही. तसेच राज्य सरकारने द्यावयाचा 40 टक्के निधीपैकीही मोठी रक्कम अद्याप या विद्यापीठाला मिळालेली नाही. यामुळे विद्यापीठ स्थापन होऊन तीन वर्षे होत आली तरीही अद्याप नव्या योजना, अभ्यासक्रम, पायाभूत सुविधांचा विकास होऊ शकलेला नाही.