चासकमान धरणात बुडून चार विद्यार्थ्यांचा गुरुवारी (दि. 19) दुर्दैवी अंत झाला. हे चारही मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असता, ’आम्हाला आमची मुले जिवंत द्या,’ असा टाहो नातेवाइकांनी शाळा प्रशासनापुढे फोडला. त्यांचा हा आक्रोश मन सुन्न करणारा होता. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथील तिवई हिलवर सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आहे. येथील मुले निवासी आहेत. मात्र, आमची मुले निवासी राहून शिक्षण घेत असल्याने शिक्षकांनी पालकांची परवानगी न घेता मुलांना धरणावर नेले. या घटनेस शाळा प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतला. या घटनेचा सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन पालकांना पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिले.
परीक्षित कुलदीप अग्रवाल (वय 16, रा. दिल्ली), नव्या प्रज्ञेश भोसले (वय 16, रा. खारघर, नवी मुंबई), रितीन डी. धनशेखर (वय 16, रा. ई. रोड, तमिळनाडू) आणि तनिषा हर्षद देसाई (वय 16, रा. निसर्ग हौसिंग सोसायटी, बावधन, पुणे) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. परीक्षितच्या मागे आई, वडील व एक मतिमंद भाऊ आहे. रितीन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तनिषाच्या मागे आई-वडील व मोठी बहीण आहे. याबाबतची माहिती विनायक अशोक शर्मा (वय 28, रा. सह्याद्री स्कूल, के. एफ. आय, तिवई हिल, गुंडाळवाडी, वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड; मूळगाव रा. फ्लॅट नं. 7, ग्राउंड प्लोअर, शिवगंगा होम्स, बँक कॉलनी, उत्तराहल्डी, बंगळुरू, कर्नाटक) यांनी दिली.