इंदापूर : ‘ओबीसी’ आरक्षणाबाबत हे सरकार डबल, ट्रिपल ढोलकी आणि केवळ ढोलकीच वाजवत आहे. हे सरकार काहीच करत नाही. सरकारमधील सर्व नेते केवळ भाषणे करतात. दोन वर्षात राज्य सरकार ‘ट्रिपल टेस्ट’ का करू शकले नाही, याचे उत्तर सरकारमधील नेत्यांनी दिले पाहिजे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिले आहे.
शुक्रवारी (दि.२०) इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर येथे फडणवीस यांनी आपले कुलदैवत लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीसांच्या काळात त्यांना ओबीसी आरक्षण देता आले नाही, ते डबल ढोलकी वाजवतात, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर केली होती. या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, नाना पटोले यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे. आमच्या काळात आम्ही 50 टक्क्यांपेक्षा वरचे आरक्षण होऊनदेखील टिकवले होते. हे आरक्षण ४ मार्च २०२० ला गेले आहे, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 13 डिसेंबरला नाना पटोले समर्थित उद्धव ठाकरे सरकारला न्यायालयाने ‘ट्रिपल टेस्ट’ करण्यास सांगितली होती, ती केली नाही. पंधरा महिने कोर्टाने वाट पाहिली, त्यानंतर ओबीसी आरक्षण रद्द केले, आरक्षण रद्द केल्यालाही एक वर्ष निघून गेले. तेव्हाही ते ‘ट्रिपल टेस्ट’ पूर्ण करू शकले नाहीत. मध्यप्रदेशने मात्र सहा महिन्यांत ‘ट्रिपल टेस्ट’ पूर्ण करून अहवाल सादर केला.
या वेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर, दौंडचे आमदार राहुल कुल, माळशिरसचे आमदार राम सातपुते, अकिंता पाटील- ठाकरे उपस्थित होते.