मुंबई : राज्याच्या पोलीस दलात लवकरच सुमारे दहा हजार पोलिसांची नव्याने भरती होणार असल्याचे गृह खात्याच्या सूत्रांनी गुरुवारी सांगितले. पोलीस कॉन्स्टेबलपदासाठी एकाचवेळी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
राज्य पोलीस दलात नुकतीच सात हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. त्यानंतर होणारी ही दुसरी मोठी पोलीस भरती आहे. त्यामुळे पोलीस दलात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. पोलीस भरतीमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी यावेळी ही भरती प्रक्रिया राज्याचे गृह खाते राबविणार आहे. अत्यंत पारदर्शी पद्धतीने ही भरती होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकर भरतीची प्रक्रिया थांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचार्यांची भरती होऊ शकली नव्हती. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलिस भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.