अकोला– धरणांमध्ये साठलेला गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकणे;त्यातून शेतजमीन अधिक सुपिक करणे व धरणांची साठवण क्षमता वाढविणे असा दुहेरी लाभ असलेला उपक्रम सध्या जिल्ह्यात राबविला जात आहे. दि.1 मे पासून सुरु झालेल्या या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’, उपक्रमामुळे आतापर्यंत (दि.18) 30 हजार 637.88 घनमिटर गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला आहे. यामुळे 394 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्णतः लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.दि. 15 जून पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दरवर्षी पावसाच्या पाण्यासोबत गाळ वाहून धरणांमध्ये साठतो. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे धरणांच्या साठवण क्षमतेत सातत्याने घट होत आहे. त्यासाठी धरणांमधील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यास शेतीची सुपिकता वाढते व धरणांच्या साठवण क्षमतेतही वाढ होते. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अकोला जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान दि.1 मे पासून राबविले जात आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु करण्यात आला असून शेतकऱ्यांनीही या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे.
अकोला जिल्ह्यात अकोला पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभाग, मृद व जलसंधारण विभाग, लघुपाटबंधारे विभाग, जि.प. अकोला या विभागांच्या अखत्यारीतील जलसाठ्यांतील गाळ काढण्याचे काम सध्या सुरु आहे. जिल्ह्यात एकूण 34 ग्रामपंचायतींच्या हद्दीत हा गाळ काढला जात आहे. त्यात अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील आठ, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील तीन, मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील आठ तर लघुपाटबंधारे विभाग जि.प. अकोला यांच्या अखत्यारीतील 15 प्रकल्पांमध्ये हे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (दि.18 अखेर) सर्व प्रकल्प क्षेत्रातील मिळून 394 शेतकऱ्यांच्या शेतात हा गाळ टाकण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 30 हजार 637.88 घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. 31 मे पर्यंत हे काम सुरु राहणार आहे.
गाळ काढण्यात येत असलेले प्रकल्प (काढण्यात आलेला गाळ घनमिटर मध्ये कंसात)-
अकोला पाटबंधारे विभाग (एकूण 15506)- उमा मध्यम प्रकल्प(8905), इसापूर लघु प्रकल्प(816), घोटा लघु प्रकल्प(340), मोझरी लघु प्रकल्प(350), पि. हांडे लघु प्रकल्प(225), मोऱ्हळ प्रकल्प (700), काटपूर्णा प्रकल्प (3390) शहापूर वृहत ल.पा. यो. (780).
लघुपाटबंधारे विभाग, अकोला(एकूण 3000)- उमा प्रकल्प (3000)
मृदा व जलसंधारण विभाग (6906)- भीलखेड तलाव-बोरी ग्रा.पं.-(80), अमबाडी ग्रा.पं.)90), राजुरा ग्रा.पं.(70), अकोली जहांगिर (80), सावरगाव ल.पा. (1248), आस(265), कुंभारी ल. पा. तलाव (123), शिवकालीन गाव तलाव राजनापूर खि.-9900.
लघु पाटबंधारे विभाग, जि.प. अकोला (5225.88)- अनकवाडी गावतलाव-1103.7, घुसर गाव तलाव(1337.18), देवर्डा गाव तलाव (480), मुंडगाव ई-क्लास शेततळे(540), दीपमाळ पाझरतलाव(150), एदलापूर गाव तलाव (100), आळंदा गाव तलाव(190), शेतगाव सिंचन तलाव(105), भेंडी महाल सिंचन तलाव(90), अनभोरा शिवकालीन तलाव (380), दधम गाव तलाव (200), देगाव गाव तलाव(200), उमरा सिंचन तलाव (180), पिंपरडोली सिंचन तलाव पेलका (110), शेकापूर सिंचन तलाव (60)
असा एकूण सर्व 34 प्रकल्पांमधून 30 हजार 637.88 घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. 394 शेतकऱ्यांच्या शेतात हा गाळ टाकण्यात आला आहे. हे काम पूर्णतः लोकसहभागातून सुरु आहे. शेतकरी स्वतः गाळ काढून आपल्या शेतात वाहून नेत आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे यांनी दिली.
तीन लक्ष घनमिटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट
जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या प्रकल्पातून अधिकाधिक गाळ येत्या 15 जून पर्यंत काढावयाचा आहे. त्यासाठी तीन लक्ष घनमिटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. गावातील नाले, नद्यांमधील गाळ काढून तो काठाने टाकणे. त्यावर पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड करणे इ. कामे या मोहिमेत करण्यात येणार आहेत. यामुळे पुरनियंत्रण, शेती सुपिक करणे इ. फायदे होतात. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींनी या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.