अकोला,दि.16: ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी त्यांच्या आरोग्याची तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधे व उपचार करण्यासाठी तालुकानिहाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य तपासणी व उपचार यासंदर्भात आज पालकमंत्री कडू यांनी बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य यंत्रणा आदी उपस्थित होते.
महिलांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांमध्ये महिलांच्या संपूर्ण आरोग्याची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. त्यातून त्यांना काही आरोग्य समस्या असल्याचे निदान झाल्यास त्यावर औषधोपचार व आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया इ. उपचार करण्यात यावे. त्यासाठी तालुकानिहाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे,असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. त्यासाठी दि.30 मे मुर्तिजापूर, दि.31 पातूर, दि.1 जून अकोट, दि.2 जून तेल्हारा, दि.3 जून बाळापूर, दि.4 जून बार्शी टाकळी, दि.5 जून अकोला ग्रामिण या प्रमाणे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे,असे निर्देश दिले.
शिबिरस्थळी प्रत्येक महिलेची नोंदणी करुन त्यांच्या सर्व आरोग्य चाचण्या मोफत कराव्या. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ डॉक्टर्स या तपासण्या करतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. निदानानंतर आवश्यक औषधोपचार व उपचार केले जातील, त्यासाठी सर्व ग्रामिण रुग्णालये, तालुका रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय या सर्व आरोग्य सुविधांमधून उपचार सुविधा दिल्या जातील. आवश्यकता भासल्यास बाहेरुन तज्ज्ञ डॉक्टर्स बोलावण्याचेही नियोजन करण्यात येईल,असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.