पुणे : राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट झाले असल्याने, या दोन्ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
पुण्यातील किडनी प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किवळे येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरोग्य भरतीसंदर्भात पोलिसांचा सविस्तर अहवाल अपेक्षित आहे. ड वर्गाची प्रश्नपत्रिका दूरपर्यंत प्रसारित झालेली होती, असे उघड झाले आहे. त्याची पुनर्परीक्षा घेण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत.
क वर्गाच्या प्रश्नपत्रिकेबाबतही अशीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असून अद्याप ते निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत. या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी समक्ष चर्चा केली असता, पुन्हा सगळी परीक्षा घेतलेली बरी, अशा निष्कर्षापर्यंत तेही आले आहेत. त्यामुळे या दोन्ही परीक्षा लवकरच घेऊन भरतीप्रक्रिया पूर्ण केली जाईल. नामांकित संस्थांकडून ऑनलाइन पद्धतीने ही भरती करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. याबाबतचे आदेश संबंधित विभागाकडून निर्गमित होतील. त्यानंतर लगेचच या परीक्षेसंदर्भातील कार्यवाही पूर्ण करू.