आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा ( Pandit Shivkumar Sharma ) यांचे आज सकाळी हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्याच्या मागे पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा असा परिवार आहे.
पंडित शिवकुमार शर्मा यांनी काश्मीरमधील लोकवाद्य संतूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून दिली. बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यांची जोडी ‘शिव-हरी’ नावाने बाॅलीवूडमध्ये प्रसिद्ध झाली. सिलसिला, फासले, चांदणी, लम्हे आणि डर चित्रपटाला या जाेडीने संगीत दिले. ९०च्या दशकात चांदनी चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चूडियां है’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले व अभिनेत्री श्रीदेवीवर चित्रीत करण्यात आलेले गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
संगीत क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेत्री दुर्गा जसराज यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. “आज निसर्गातील संगीत शांत झालं. पंडित जसराज यांच्यापाठोपाठ पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधनाचे वृत्त हे मला अतीव दु:ख देणारे ठरलं आहे,” असे तिने म्हटलं आहे.