“आम्ही पहिले अयोध्यावासी, नंतर भाजपाचे नेते आहोत. हम किसको छेडते नही है और छेडनेवालों को छोडते नही है. आधी शिव्या द्यायचा आणि आता कशाला उत्तर प्रदेशमध्ये येता? पहिल्यांदा उत्तर भारतीयांचा अपमान का केला? राज ठाकरेंना माझा एकट्याचा विरोध नाही, ही एक जनभावना आहे. हे आंदोलन राजकारण करण्यासाठी केलेले नाही. ठाकरेंना अयोध्येत घ्यायचं की ते महंत ठरवतील. त्यांना महंतांची माफी मागितली की, ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करू”, असे मत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मांडले.
उत्तर प्रदेशाच्या नंदिनीनगरमध्ये राज ठाकरेंच्या अयोध्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत ब्रिजभूषण बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “राज ठाकरेंनी संपूर्ण उत्तर प्रदेशची माफी मागण्याची गरज नाही. फक्त संत-महंतांची माफी मागितली तरीही आम्ही त्यांचं स्वागत करु. मी महाराष्ट्राचा आदर करतो. त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी सर्वांची भूमिका आहे. माफीशिवाय युपीत पाय ठेवू देणार नाही”, अशा इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
उत्तर भारतीयांना कट्टर विरोध करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी नंदिनीनगरमध्ये मोठी रॅली काढली आहे. त्यांनी मोठ्या सभेचेदेखील आयोजन केलेले आहे. “राज ठाकरेंनी पहिल्यांदा माफी मागावी, तर अयोध्येमध्ये प्रवेश दिला जाईल अन्यथा उत्तर प्रदेशमध्ये त्यांना घुसू देणार नाही. आम्ही उत्तर भारतीयांचा अपमान खपवून घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशाच्या नागरिकांनी दिली आहे.