रशियाने पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क क्षेत्रातील बिलोहोरिवको गावातील एका शाळेवर बाॅम्बहल्ला केला. यामध्ये २ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ६० लोकांचा इमारतीच्या राडारोड्याखाली दबून मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राॅयटर्सच्या बातमीनुसार लुहान्स्कचे गव्हर्नर सेरही गदाई यांनी ही माहिती दिली आहे.
गव्हर्नर गदाई म्हणाले की, “रशियाच्या सैन्याने दुपारी शाळेवर बाॅम्बहल्ला घडवून आणला. या ठिकाणी ९० लोकांनी आसरा घेतलेला होता. या बाॅम्बहल्ल्यात इमारतीला आग लागली. ४ तासांनंतर आग विझविण्यात यश आले. नंतर राडारोडा हटविण्यात आला. त्यामध्ये २ लोकांचा मृतदेह सापडला.” या घटनेची पुष्टी रशियाकडून अजूनही करण्यात आलेली नाही.
“त्या राडारोड्यातून ३० लोकांना बाहेर काढण्यात आले असून ते गंभीर जखमी आहेत. तसेच त्या इमारतीच्या खाली ६० लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे”, अशी माहिती गव्हर्नर गदाई यांनी दिली. युक्रेन आणि पश्चिमीकडील देशांकडून रशियन सैन्य सामान्य नागरिकांवर निशाणा साधत आहे, असा आरोप केला जात आहे. मात्र, रशियाने या दावा खोडून काढला आहे.