नवी दिल्ली : देशातील प्रजनन दर 2.2 वरून 2.0 वर आला असल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-5 (एनएफएचएस-5) मधून स्पष्ट झाले आहे. ‘एनएफएचएस-4’मध्ये प्रजनन दर 2.2 नोंदविला गेला होता.
देशातील प्रजनन दर प्रतिमहिला अपत्यांच्या संख्येवरून ठरविला जातो. देशातील पाच राज्यांचा दर मात्र 2 पेक्षा जास्त आहे. बिहार (2.98), मेघालय (2.91), उत्तर प्रदेश (2.35), झारखंड (2.26) आणि मणिपूर (2.17) ही ती राज्ये आहेत. देशाच्या 707 जिल्ह्यांमध्ये 6.37 लाख निवडक कुटुंबांचे सर्वेक्षण केंद्रीय आरोय विभागाने केले होते. यात 7 लाख 24 हजार 115 स्त्रियांनी आणि एक लाख 1 हजार 839 पुरुषांनी भाग घेतला. कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर करण्याचे प्रमाण मागील सर्वेक्षणात 54 टक्के होते, ते 67 टक्के झाल्याचे 2020-21 मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. पाच वर्षांखालील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण 38 वरून 36 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण 2019-21 दरम्यान 37 टक्के, तर शहरी भागात 30 टक्के आढळले. पुद्दुचेरीमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वात कमी 20 टक्के, तर मेघालयात सर्वाधिक 47 टक्के आहे. 12 ते 23 महिने वयोगटातील 77 टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मागील सर्वेक्षणात हा आकडा 62 टक्के होता.
रुग्णालयांतील प्रसूतीचे प्रमाण वाढले
‘एनएफएचएस-5’च्या निष्कर्षांमध्ये रुग्णालयांत प्रसूती होण्याचे प्रमाणही 89 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आधीच्या सर्वेक्षणात ते 79 टक्के होते. ग्रामीण भागातही 87 टक्के प्रसूती रुग्णालयांत झाल्या. शहरी भागात हे प्रमाण 94 टक्के आहे. आसाम, बिहार, मेघालय, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये रुग्णालयांमधील प्रसूतींचे प्रमाण वाढले आहे.