कोल्हापूर : विद्यापीठाच्या ऑफलाईन 740 परीक्षांसाठी 2 लाख 20 हजार विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षा जुलैपर्यंत पूर्ण होतील. द्वितीय वर्षाच्या परीक्षा आठ दिवस पुढे जातील. सर्व विद्यापीठात जाऊन परीक्षांचा आढावा घेणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सीमा भागातील अभ्यास केंद्रात काजू प्रक्रिया, बटाटे, रताळे प्रोसेसिंग कोर्सेस यासह ड्रेस डिझाईन व ट्रॅव्हल व टुरिझम अभ्यासक्रम सुरू केले आहेत. भविष्यात स्वत:च्या जागेत याचे स्थलांतर केले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ज्वेलरी डिझाईनिंगचा डिप्लोमा सुरू करावा, अशी मागणी सराफ व्यावसायिकांनी केली होती. त्यानुसार हा अभ्यासक्रम यावर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. राजाराम महाविद्यालय 2.50 कोटी व पॉलिटेक्निक कॉलेजला 4.50 कोटी रुपये दुरुस्तीसाठी देण्यात येतील. प्राध्यापकांच्या 2088 जागा संवर्गनिहाय भरल्या जाणार आहेत. 1179 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षणचे संचालक भरण्याचा निर्णय घेतला असून याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.