Share Market Crash : शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) आज शुक्रवारी सकाळी सुमारे १ हजार अंकांनी कोसळला. तर निफ्टी (Nifty) १६,३०० च्या खाली येऊन व्यवहार करत आहे. बाजार खुला होताच सेन्सेक्स ५४,७०० च्या खाली येऊन व्यवहार करत होता. कमकुवत जागतिक संकेतांचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे.
भारतीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात झालेली घसरण (Share Market Crash) ही १ टक्के एवढी आहे. या घसरणीमुळे काही मिनिटांत गुंतवणूकदारांना ५.१२ लाख कोटींचा फटका बसला. मागील सत्रातील २५९.६४ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत आज गुंतवणूकदारांची संपत्ती ५.१२ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन २५४.५२ लाख कोटी रुपयांवर आली.
सेन्सेक्समधील सर्व ३० स्टॉक्स लाल रंगात दिसत होते. बीएसई मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ५३० आणि आणि ६९० अंकांनी कोसळले. कंझ्युमर ड्युरेबल्स आणि आयटी क्षेत्रातील स्टॉक्स टॉप लुजर्स ठरले. ते त्यांच्या बीएसई निर्देशांकांसह अनुक्रमे १०४१ अंक आणि ७४९ अंकांनी घसरले.
बजाज फायनान्सचा BSE वर NBFC चा स्टॉक ३.१३ टक्क्यांनी घसरून ६,११३ रुपयांवर आला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप अर्थात बाजार भांडवल ३.७० लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. आज हा शेअर २.१५ टक्क्यांच्या घसरणीसह ६,१७५ रुपयांवर खुला झाला.
मारुती सुझुकीचा बीएसईवर ऑटो स्टॉक ३.३ टक्क्यांनी घसरून ७,१६१ रुपयांवर आला. विप्रोचा आयटी स्टॉक २.७७ टक्क्यांनी घसरून ४८७ रुपयांवर आला. लार्ज कॅप स्टॉक बीएसईवर ३.०७ टक्क्यांनी घसरून निचांकी ४८५ रुपयांवर पोहोचला. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल २.६७ लाख कोटी रुपयांवर आले आहे.