अकोला दि.2:- अकोला शहरालगत घुसर व अनकवाडी येथे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव तलावातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली.
जलसंधारण विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याची सुरुवात घुसर व अनकवाडी या गावात अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने या करीता एक जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. तर गाळ शेतात वाहून नेण्यासाठी ग्रामस्थांनी एकूण ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. गाळ काढण्यात आल्याने पाणीसाठ्यात १३ टीसीएम एवढी वाढ होईल,असे अनुमान आहे. तलावातील काढलेला गाळ हा शेती साठी उपयुक्त असून हा गाळ शेतकऱ्यांना शेती साठी देण्यात आला. गावकऱ्यांनी पीक बदलातून शेती व्यवसाय फायदेशीर केला आहे. गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत. गावची पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून प्रयत्न सुरू केले. पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तलावातील वाढते पाणी पाहून ग्रामस्थांचा उत्साह वाढला आहे. टंचाई कायमस्वरुपी दूर होण्याच्यादिशेने हे प्रयत्न उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले. या कार्यक्रमास तहसिलदार सुनिल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.