रत्नागिरी : ट्रॉलिंग मासेमारी परवाना असताना पर्ससीन जाळे वापरून मासेमारी करणार्या नौका मालकाला तब्बल 2 लाख रु. दंड भरावा लागला. त्याचबरोबर सुमारे 12 लाख रु. किमतीचे पर्ससीन जाळेसुद्धा जप्त झाले आहे. अभिनिर्णय अधिकारी तथा सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी हा निर्णय दिला. ‘श्री महालक्ष्मी’ असे नौकेचे नाव असून, नौका मालक नितीश नायक यांनी दंडाची रक्कम भरून आपली नौका सोडवली असली तरी पुढील इतर कारवाया केल्या जात असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी सांगितले.
पोलिसांचे सागरी सुरक्षा कवच 12 एप्रिल रोजी सुरू होते. या प्रात्यक्षिकाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील दाभोळ समुद्रकिनारी पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यावेळी समुद्रकिनार्यापासून जवळच 2 ते 3 नॉटीकल मैल अंतरावर समुद्रात ही ‘श्री महालक्ष्मी’ मासेमारी नौका मासेमारी करताना आढळून आली. पोलिसांनी ही नौका पकडून ती कारवाईसाठी सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडे दिली.
सहायक मत्स्य व्यवसाय विभागाने ही नौका अटकावून ठेवली. नौकेची तपासणी केली असता नौकेत पर्ससीन जाळे मिळून आले. परंतु, या नौकेला ट्रॉलिंग मासेमारी परवाना होता.