मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झालेत. शैक्षणिक शुल्क जर कमी केलं नाही तर विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विद्यापीठाला अनेकदा निवेदनं देऊनही यावर कुठल्याच प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आंदोलनाची हाक देण्यात आलीये. विद्यापीठ प्रशासनाला फी वाढीबाबत जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर फी कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे.
कोरोनाकाळात सगळ्यांचीच आर्थिक घडी विस्कटली. नोकरीचे प्रश्न निर्माण झाले. बेरोजगारी तर वाढलीच पण शासकीय सोडलं तर आहे त्या नोकरीत सुद्धा लोकांचे हाल झाले. पगारपाणी या सगळ्याचीच या काळात बोंब होती. कोरोना काळात शाळा, महाविद्यालयांच्या शुल्कात बदल करण्यात यावेत म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मागणी केली. शाळांसाठी पालकांनी तर मागणी करण्यात आंदोलनं केली आणि खासगी इंग्रजी शाळा आणि सीबीएसई शाळा यांच्या शुल्कात गेल्या वर्षी 10 टक्के सूट देण्यात आली.
शाळांपाठोपाठ शैक्षणिक शुल्क वाढीचा महाविद्यालयांना देखील सामना करावा लागतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची झालेली तिप्पट शैक्षणिक शुल्क वाढ बघून आता विद्यार्थी आक्रमक झालेत. फी वाढीमुळे परीक्षा देण्यास अडचणी निर्माण होतात त्यामुळे विद्यापीठाने काय तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती विद्यार्थ्यांकडून करण्यात आलीये.