नवी दिल्ली : कोरोना महारोगराईने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. या अनुषंगाने आता ६ ते १२ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय औषध महानियंत्रकांनी (DGCI) मंगळवारी यासंबंधीची मंजुरी दिली असल्याचे कळतेय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार भारत बायोटेक निर्मित स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लस या वयोगटातील बालकांना देण्यात येणार आहे.
काही अटींच्या अधीन डीजीसीआयने या वयोटातील बालकांसाठी आपत्कालीन वापरासाठी लस वापराची (DGCI) मंजुरी दिल्याचे कळतेय. यापूर्वी १२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण १६ मार्चपासून सुरु करण्यात आले आहे. या वयोगटातील मुलांना २८ दिवसांच्या अंतराने ‘कोर्बेव्हॅक्स’चे दोन डोस दिले जात आहेत. तर, ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन ही लस दिली जात आहे. डीजीसीआयच्या विषय तज्ञ समितीने ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची शिफारस नुकतीच केली होती. तज्ज्ञ समितीच्या बैठकीनंतर बालकांच्या लसीकरणासंबंधीचा प्रस्ताव डीसीजीआयकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता.