मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. यामुळे एसटी कर्मचारी आता कामावर परतू लागले आहेत. काल गुरुवारी राज्यभरात २,९९२ एसटी कर्मचारी रूजू झाले आहेत. आतापर्यंत राज्यभरात एकूण ७६,९६२ एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
एसटी महामंडळाच्या हजेरी पटलावर ८२,१०८ इतकी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. एसटी महामंडळ प्रशासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासंदर्भात २२ एप्रिलची मुदत देण्यात आली होती. अद्यापही ५,१४६ कर्मचारी हे कामावर रुजू झालेले नाहीत. २२ एप्रिलपर्यंत १०० टक्के कर्मचारी हे कामावर उपस्थित राहतील असा विश्वास एसटी महामंडळाकडून वर्तविण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यातील कराड आगारातील ९० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह इतर सर्व ठिकाणी बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही एसटी सेवा पुर्ववत सुरु झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी धावू लागली आहे. मालेगाव आगारातील ४१७ पैकी २९८ कर्मचारी सेवेवर दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही एसटी कर्मचारी कामावर हजर होऊ लागले आहेत. जवळपास २ हजारांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी नोव्हेंबरपासून संप पुकारला होता. संपामुळे ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक थांबली होती. त्यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गांचे हाल झाले होते. उन्हाळी सुट्टीत पर्यटन स्थळ व गावाकडे कसे जायचा असा प्रश्न नागरिकांना पडला होता. २२ एप्रिलपर्यंत एसटी कर्मचार्यांना कामावर हजर होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचारी कामावर हजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार गावागावात एसटी वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे.
लांब पल्ल्यासह शटल व ग्रामीण फेर्या विविध आगारामार्फत पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावागावामध्ये लालपरी सुसाट धावू लागल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.