अकोट (देवानंद खिरकर) – न्यायालयीन खर्चासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पैसे जमा केले होते. हे पैसे अजय गुजर यांना फोन पे द्वारे पाठविले. मात्र, त्यानंतर अकोट शहर पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, अजय गुजर व माझ्यावर गुन्हे दाखल झाले. फसवणुकीचे गुन्हे दाखल असले तरी, या सर्व प्रकरणात आता माझीच फसवणूक झाली आहे, असा आरोप प्रफुल्ल गावंडे यांनी काल शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
अकोट शहर पोलीस ठाण्यात एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी गुणरत्न सदावर्ते, ऍड. जयेश पाटील, अजय गुजर व अकोट आगारातील वाहक प्रफुल्ल गावंडे यांच्यावर कर्मचाऱ्यांची ७४ हजार ४०० रुपयांनी फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी या चौघांवर गुन्हे दाखल केले.
मात्र, या प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल गावंडे यांनी आज आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, “अजय गुजर यांच्या माध्यमातून गुणरत्न सदावर्ते यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. अजय गुजर यांनी व्हिडिओ कॉल द्वारे न्यायालयीन कामकाजासाठी आमच्याशी संभाषण केले. अकोट आगारातील कर्मचाऱ्यांना तीनशे रुपये व जे निलंबित झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना पाचशे रुपये गोळा करण्याचे सांगितले होते. कोणाकडे फोन पे नव्हता म्हणून माझ्याकडे असल्याने ते पैसे जमा केले. ७४ हजार ४०० रुपये ही रक्कम जमा झाली आणि ती रक्कम फोन पेच्या माध्यमातून अजय गुजर यांना पाठवले.” अशी माहिती आरोपी प्रफुल्ल गावंडे यांनी दिली.
मात्र, अजय गुजर यांनी हे पैसे सदावर्ते यांना दिले किंवा नाही हे मला माहीत नाही. विशेष म्हणजे, या संपामध्ये कर्मचाऱ्यांना जो न्याय पाहिजे होता तो मिळालेला नाही, याची खंत आहे, अशी प्रतिक्रिया फसवणूक प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल गावंडे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, सेनेचे नेते राहुल कराळे, अनंता गावंडे उपस्थित होते.