सातारा : सातारा व कोल्हापूरच्या राजेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना सहावे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचा सरकार पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. दरम्यान, न्यायालयात दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तिवाद सुरू असताना दोनवेळा चांगलीच खडाजंगी झाली.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी सायंकाळी सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरुध्द 9 ऑक्टोबर 2020 रोजी तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी राजेंद्र निकम (रा.तारळे ता.पाटण) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अॅड. सदावर्ते एका न्यूज चॅनलवर मत मांडत असताना त्यांची जीभ घसरली त्यावरुनच सातार्यात गुन्हा दाखल झाला आहे.