मुंबई : राज्यातील तब्बल 8 लाखाहून अधिक नोंदणी असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलचे (सीईटी सेल)आयुक्त रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली आहे.
सरकारने गेल्या सहा वर्षांत 8 ते 9 आयुक्त सीईटी सेलला दिले आहेत. लाखो विद्यार्थ्यांची प्रवेश यंत्रणा सांभाळत असलेल्या सीईटी सेलला सलग तीन वर्षे सनदी अधिकारी मिळालेला नाही. यामुळे आता नव्याने येणारे आयुक्त तरी थांबणार की, सहा महिन्यांत दुसरे येणार, अशी चर्चा रंगली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा एका छत्राखाली आणण्याचा निर्णय 2015 मध्ये सरकारने घेतल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची (सीईटी सेल) स्थापना केली. त्यानंतर प्रवेश नियामक प्राधिकरण (एआरए) आणि राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) एकत्र आणले.