मुंबई: मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. गेल्या साडे पाच महिन्यात काही कर्मचारी सेवेसाठी दाखल झाले होते, पण सदावर्ते यांना अटक होताच जवळपास १५ हजार कर्मचारी सेवेसाठी दाखल झाले आहेत.
एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याने आंदोलन दिवसेंदिवस चिघळतच चालले होते. वेतनवाढीनंतर हळूहळू कर्मचारी कामावर येण्यास सुरूवात झाली होती. परंतु वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही कर्मचारी अजूनही आंदोलनाच्या पावित्र्यात होते.
दरम्यान, एक आठवड्यांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करताच या आंदोलनाची दिशा कोण ठरवणार यावरून मुंबईच्या आझाद मैदानात गोंधळाची परिस्थिती झाली होती. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरून एसटी कर्मचाऱ्यांना हटवून आपापल्या गावी जाण्यास सांगितले.
एक आठवड्यानंतर कर्मचारी कामावर रुजू होऊ लागल्याने एसटी सेवा सुरळीत होण्यास सूरूवात झाली आहे. जवळपास १५ हजार कर्मचारी कामावर हजर होत असल्याची माहिती मिळत आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी गायब
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जयश्री पाटील यांचा शोध सुरू आहे. सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडलं होतं. दरम्यान, जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. मुंबई पोलिसांचे संरक्षण त्यांनी का सोडलं असा सवाल उपस्थित केला जात आहे.