अकोला – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे दरवर्षी प्रमाणे विविध खेळांचे अनिवासी नि:शुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिरास विविध वयोगटातील खेळाडूंचा प्रतिसाद लाभत आहे. हे शिबिर वसंत देसाई क्रीडांगण येथे दि. 12 ते 30 या दरम्यान होणार आहे. या शिबीराचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, बॉक्सींग संघटनेचे विजय शर्मा, कृष्णकुमारी शर्मा तसेच क्रीडा मार्गदर्शक सर्व सतिशचंद्र भट, लक्ष्मीनगर यादव, विजय खोकले, पंकज बांबळे, गोविंद दरपे, योगेश घुगे, प्रविण खंडारे, केतन गजभिये, रवि रामटेके यांची उपस्थिती होती.
या शिबीरात कुस्ती, बॉक्सींग, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, मैदानी, बास्केटबॉल, वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांबाबत मार्गदर्शक करण्यात येत आहे. नवोदित खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, खेळाडूंनी नियमित सरावासाठी मैदानावर उपस्थित रहावे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकीक मिळवावा. शिबीराचा कालावधी पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सम्मानीत करण्यात येणार आहे. सुत्रसंचालन लक्ष्मीशंकर यादव यांनी तर आभार प्रदर्शन विजय खोकले यांनी केले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू कु. पलक झामरे, राहिल सिद्दीकी, हरीवंश टावरी यांचीही उपस्थिती होती.