अकोला– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सप्ताहाअंतर्गत मंगळवारी (दि.12) युवा उद्योजकांसाठी स्टँडअप इंडिया योजने अंतर्गत ‘मार्जीन मनी’ योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिनस्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अकोला येथील सांस्कृतिक सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.
अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड या होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी झळके व युवा उद्योजक आशिष चौखंडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना रोजगाराच्या संधी व शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती बाबत मार्गदर्शन केले. स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जीन मनी योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेले अकोला जिल्ह्यातील लाभार्थी रवींद्र घनबहादूर, रणजीत सरदार व सुगत तेलगोटे यांचा विभागामार्फत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष चोटमल यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण या कार्यालयातील सर्व कर्मचारी व समतादूत यांनी परिश्रम घेतले. विशेष अधिकारी पी.डी. सुसतकर यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण निरीक्षक उमेश वाघ व उमेश उगले यांनी नियोजन केले.