अकोला- येथील बालकल्याण समितीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने व नविन समितीची नियुक्ती प्रक्रिया अद्याप सुरु असल्याने सद्यस्थितीत अकोला येथील बालकल्याण समितीचा कार्यभार आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांनी वाशिम येथील बालकल्याण समितीकडे सोपविला आहे. नुकताच या समितीने अकोला येथील पदभार स्विकारुन कामकाजास सुरुवात केली, असे जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी कळविले आहे.
बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 च्या कलम 27 नुसार बाल कल्याण समितीची रचना नमुद आहे. या समिती मध्ये एक अध्यक्ष चार सदस्य असतात. पाच ही सदस्य हे बालकांच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असतात. ही समिती तीन वर्षाकरीता नियुक्त असते. समितीला बेंच ऑफ मॅजिस्ट्रेटचा दर्जा प्राप्त असतो. काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालकाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत. अशा बालकांची काळजी त्यांच्यावरील उपचार, त्यांचे संगोपन, त्यांचा विकास, त्यांचे संरक्षण आणि त्या सोबत त्यांचे पुर्नवसन कोणत्या प्रकारे आणि अशा बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावुन घेण्यासाठीचे सर्व प्रयत्न करण्याचे अधिकार बाल कल्याण समितीस कायद्यायाने प्रदान करण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यात कार्यरत बालकल्याण समितीचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे व नवीन समिती गठनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने अकोला बालकल्याणसमितीचा अतिरिक्त कार्यभार वाशिम बाल कल्याण समितीकडे आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या पत्रान्वये सोपविण्यात आला आहे. त्यानुसार, वाशिम बालकल्याण समिती सदस्य अॅड. जोशी, मुधोळकर, श्रीमती ताजन्हे हे रूजु झाले आहेत.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, सौ.पल्लवी कुळकर्णी, अॅड.सुनिता कपीले बाल न्याय मंडळाचे सदस्य अॅड.संजय सेंगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, शासकीय निरीक्षण गृहाच्या अधीक्षक श्रीमती जयश्री वाढे, चाईल्ड लाईनच्या हर्षाली गजभिये, पदमाकर सदाशिव, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, सचिन घाटे यांनी समितीचे स्वागत केले. समितीने त्यानंतर गायत्री बालिकाश्रम, सुर्यादय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह येथे भेटी दिल्या व पाहणी केली.