अकोला– भटक्या श्वानांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना दत्तक घेण्याची योजना राबवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले. या उपक्रमास श्वान प्रेमी नागरिकांनी सहकार्य करुन शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न सोडविण्यास मदत करावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची सभा आज पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निमा अरोरा या होत्या. या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, मनपा उपायुक्त पुनम कळंबे, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन सागर तेलकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. कोमल बेंद्रे, पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, वन विभागाचे सुरेश वडोदे, परिवहन विभागाचे गजानन दराडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अरोरा यांनी सांगितले की, गावठी मोकाट श्वान जे रस्त्यात भटकत असतात, त्यांचा प्रश्न सोडवणूक करण्यासाठी श्वानप्रेमी नागरिकांनी ह्या श्वानांना दत्तक घेऊन सामाजिक दायित्व स्विकारावे. या संदर्भात दि.30 रोजी श्वान दत्तक कार्यक्रमाचे नियोजन करावे. नोंदणीकृत प्राणी मित्रांमार्फत हा कार्यक्रम करावा. त्यासाठी भटक्या श्वानांना विशिष्ट रंगाचे डॉग कॉलर लावण्यात यावे,अशी सुचनाही त्यांनी केली. तसेच कापशी येथे जनावरांकरीता निवारा केंद्र स्थापन करणे, जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राच्या आवारात बीओटी तत्त्वावर पशुखाद्याचे अल्पोपहार गृह पशुंसाठी सुरु करण्याबाबत आढावा घेतला तसेच या उत्पन्नातून प्राणी मुक्तता केंद्र तयार करण्याची सुचना दिली. उघड्यावर मांस विक्रीची दुकाने बंद करण्यात यावी. शहरातील लोकसंख्या व भौगोलिक स्थितीनुसार मांस विक्रेत्यांना महानगरपालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी. जिल्ह्यात प्राण्यांच्या होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने कडक कारवाई करावी.संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता वन्य पशुंसाठीही वन तळे तयार करण्यात यावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले.