अंगाची काहिली करणार्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली सुरू झाल्या असून, यंदा देशात 98 टक्के मान्सून बरसणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिला आहे.
यंदा मान्सून चांगला बरसण्याची चिन्हे आता पासून दिसत आहेत कारण उन्हाळा कडक आहे. स्कायमेट या संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, केरळ, तामिळनाडू, या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर गुजराथ, राजस्थान, नागालँड, मणिपूर, मिझोराम भाग सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिला आहे.
गेल्या चोवीस तासांत देशातील वातावरण बदलले असून, हिमालयात पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली दिसण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षी ही स्थिती 2 एप्रिलला दिसली होती. यंदा 12 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. 13 ते 16 एप्रिल या कालावधीत देशातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा हवमान शास्त्र विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरासह महाराष्ट्र ते कर्नाटक अशी वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने राज्याचे कमाल तापमान 2 ते 4 अंशांनी आगामी तीन दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे.उत्तरी पकिस्तान ते जम्मू कश्मीरसह उत्तर प्रदेशातही हवेची द्रोणीय स्थिती झाल्याने त्या भागातही मान्सूनपूर्व पावसाचे संकेत आहेत.
असा असेल यंदाचा मान्सून..
जून : 166.9 मि.मी. (107 टक्के)
जुलै : 285 मि.मी. (100टक्के)
ऑगस्ट : 258 मि.मी (95 टक्के)
सप्टेंबर : 170.2 मि.मी (90 टक्के)