मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा साैम्य झटका आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना साैम्य झटका आला आहे. मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे व अन्य काही नेते तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.
ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये डॉ समदानी यांनी तपासणी केली. त्यांच्यावर उपचार सुरु असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणि डॉक्टरांनी आठ दिवसाचा विश्रांतीचा सल्ला दिला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, मुंडे हे सोमवारी दिवसभर बीड आणि परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर होते. मंगळवारी ते मुंबईत हाेते. सायंकाळी साडे सहा वाजता ते जनता दरबार आटोपून निवासस्थानाकडे निघाले असता त्यांच्या अचानक छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने ब्रीच कँडीत नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचे कारण नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले.