मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात येऊन उत्तर सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेकडून राज ठाकरे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्याची घोषणा केली. परिणामी पोलिस सतर्क झाले आणि विजय घाटे यांना ताब्यात घेऊन पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मशिदींवरील भोंगे काढणे आणि मुंब्र्यातील मदरशांवर धाडी टाकण्याची मागणी मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली आणि त्यांच्यावर टीकेची एकच झोड उठली. या टीकेला उत्तर देण्यासाठी आज सायंकाळी ठाण्यात सभा घेणार आहेत. सभेच्या परवानगी नाट्य नंतर ९ ऐवजी १२ एप्रिलला परवानगी मिळाली.
आता रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष विजय घाटे यांनी ठाकरे यांना काळे झेंडे दाखविण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कामगारांनी आंदोलन केले आणि राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पोलिसांवर कारवाई झाली. यातून धडा घेत ठाणे पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेवर करडी नजर ठेवून कुठला अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत घाटे यांना ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.