बोर्डी- मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते.देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात आजचे बालक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात व त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे. ह्याच उदात्त हेतूने शासनाने शाळापूर्व तयारी अभियान राबविण्याचे ठरविले आहे .
आज दि.०९ एप्रिल २०२२ शनिवार रोजी सकाळी ८.०० वाजता जि. प. व.प्राथ. सेमी इंग्रजी आदर्श शाळा बोर्डी येथे इयत्ता १ ली त दाखल होणाऱ्या मुलामुलींसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम मेळाव्याची सूचना गावकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आदल्या दिवशी दवंडी देऊन गावातून विविध संदेशासह वाजतगाजत भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. गावातील अंगणवाडी सेविकां, शिक्षक यांनी ६ वर्षे पूर्ण झालेल्या दाखलपात्र मुलामुलींच्या घरी भेटी देऊन पालकांचे उद्बोधन केले, शासनाचा संदेश त्यांच्या पर्यत पोहोचविला व त्यांना मेळाव्यात येण्यासाठी प्रेरित केले.
जि.प .सदस्य श्री. प्रकाश भाऊ आतकड यांचे शुभहस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोर्डी गावच्या सरपंच सौ. स्वातीताई चंदन शा.व्य.स. अध्यक्षा सौ. सविता सोनोने , उपाध्यक्षा सौ. पुनम मनोज सोळंके , शा. व्य.स. सदस्या रजाने ताई पत्रकार श्री. देवानंदजी खिरकर तथा पालकवर्ग , व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची आराध्यदैवत सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून व हारार्पण करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प प्रदान करून स्वागत करण्यात आले.यानंतर मु.अ. उमेश चोरे यानी आपल्या प्रास्तविकामधून उपस्थित पालकांना मेळाव्याचे महत्त्व विषद केले.विदयार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक तथा मानसिक विकासासाठी, त्यांना क्षमतानुरूप अध्ययन अनुभव देण्यासाठी मेळाव्यामध्ये विविध स्टॉल मांडण्यात आले होते.यापूर्वी मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी या स्टॉल साठी विविधांगी शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली.
यावेळी श्री. प्रकाश भाऊ आतकड यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. पहिल्याच दिवशी दाखलपात्र एकूण ५० मुलांपैकी ३७ मुलांचा इयत्ता १ ली त प्रवेश निश्चित करण्यात आला.
मेळाव्यामध्ये उपस्थित माता पालक, ग्रा.पं. सदस्य, शा.व्य.स. सदस्य यांची शाळा परिसरात मोकळीका घेऊन सर्वांचे नाव, आवडी, छंद इ. बाबत परिचय घेण्यात आला.मेळाव्याला भेट देण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात उत्साह दर्शविला. पहिल्या स्टाँलपासून म्हणजे नोंदणी ते समुपदेशन सर्व बाबी विद्यार्थी निहाय पार पाडण्यात आल्यात.
शाळापूर्व तयारी मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस शाळा व्य.स. यांनी परिश्रम घेतले.यावेळी दाखलपात्र मुले – मुली, पालकवर्ग, ग्रा. पं. सदस्य, शा.व्य.समिती सदस्य , ग्रा.प. सदस्य व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा मध्ये बोर्डी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात यश संपादन केले या करीता ग्रामीण रूग्नालय अकोट च्या वतीने प्राप्त स्कुल बॅग,टीफिन बॅग , टी शर्टस यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.